कवठेमहांकाळ : माथाडी कामगारांवरील कथित दादागिरी आणि मारहाणीच्या घटनांविरोधात बोरगाव टोलनाक्यावर माथाडी कामगारांनी आक्रमक आंदोलन केले. सिमेंट वाहतूक करणारे ट्रक रोखून ठेकेदाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि कंपनीचे पोस्टर जाळण्यात आले. दरम्यान, कवठेमहांकाळ पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
माथाडी कामगार नेते हरिभाऊ लेंगरे यांनी आक्रमक भूमिका मांडत कामगारांवरील अन्याय व दादागिरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला. कामगारांना मारहाण करण्यासाठी गुंडांचा वापर केला जात असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. ठेकेदाराने दादागिरी तत्काळ थांबवावी, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असे लेंगरे यांनी स्पष्ट केले.
आंदोलनादरम्यान पोस्टर जाळण्यावरून कामगार नेते आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी पोस्टर जाळू नये, अशा सूचना दिल्या होत्या; मात्र तरीही आंदोलनकर्त्यांनी पोस्टर पेटवून निषेध नोंदवला. ट्रक रोखण्यात आल्याने महामार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतल्याचे समजते; मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे.