मिरज : सोनी (ता. मिरज) येथे जमिनीची खरेदी करून देण्याच्या बहाण्याने वीरपत्नीची तब्बल ९५ लाख १३ हजार ८० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अनिता राजेंद्र बागणे (रा. सोनी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा नातेवाईक संशयित संजय शिवाजी बागणे (रा. सोनी) याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता बागणे या वीरपत्नी आहेत. त्यांचे पती भारतीय सैन्यात देशसेवा करताना शहीद झाले. पतीच्या निधनानंतर सरकारकडून अनिता यांना ९५ लाख १३ हजार ८० रुपयांची आर्थिक मदत मिळाली होती. या रकमेतून जमीन खरेदी करून देतो, असे आश्वासन त्यांच्या नात्यातीलच संशयित संजय बागणे याने अनिता यांना दिले. यानंतर त्याने अनिता यांच्या बँक खात्यातील सर्व रक्कम काढून घेतली. रक्कम घेऊनदेखील त्याने जमीन खरेदी करून दिली नाही.
अनिता यांनी संजय याच्याकडे जमीन खरेदीच्या कागदपत्रांबाबत व व्यवहाराबाबत विचारणा केली असता त्याने वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. अखेर अनिता यांनी आपली रक्कम परत मागितली असता, ती रक्कमही देण्यास संजय याने स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिता बागणे यांनी थेट मिरज ग्रामीण पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. अनिता यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित संजय बागणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.