विवाहितेचा छळ File Photo
सांगली

Sangli News : नोकरी सोडण्यासाठी विवाहितेचा छळ

पतीसह पाचजणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

जत : नोकरी सोडण्यासाठी दबाव आणत पैशांची मागणी करणे, शिवीगाळ व मारहाण करून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी तिच्‍या पतीसह पाचजणांविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल कोंडिबा हुबाले, रंजना कोंडिबा हुबाले, कोंडिबा पंडित हुबाले, विशाल कोंडिबा हुबाले आणि धनश्री अजय सरगर (सर्व रा. हुबाले वस्ती, नांगोळे, ता. कवठेमहांकाळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २९ वर्षांची असून त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०२३ ते ६ जून २०२६ या कालावधीत संशयितांनी घरातील कामावरून वारंवार टोमणे मारून अपमान केल्याचा आरोप आहे. तसेच जेवण बनविता येत नाही, नीट काम करता येत नाही, स्वयंपाक व भांडी करता येत नाही, अशा कारणांवरून त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

वाहनाचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर काठीने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच हात पिरगळणे, शिवीगाळ करणे आणि नोकरी सोडण्यासाठी दबाव आणल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

शासकीय कार्यक्रमात फिर्यादीचा फोटो दिसल्यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच जिन्यावरून ढकलून दिल्याने हाता-पायांना दुखापत केल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या वडील व भावालाही संशयितांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT