आष्टा : लग्नात सोफासेट आणि दोन तोळ्यांची सोन्याची अंगठी दिली नाही, तसेच नेट कॅफे दुरुस्तीसाठी माहेरहून १ लाख रुपये घेऊन ये, या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्रुतिका तेजस पाटील (वय २१) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती तेजस धोंडिराम पाटील आणि सासू सुरेखा धोंडिराम पाटील (दोघे रा. आरवडे, ता. तासगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रुतिका यांचा विवाह ३० नोव्हेंबर २०२५ रोजी तेजस पाटील याच्याशी झाला होता. विवाह झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, म्हणजेच १० डिसेंबर २०२५ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पती व सासूने संगनमत करून श्रुतिका यांचा छळ सुरू केला. ‘तुझ्या वडिलांनी लग्नात सोफासेट आणि दोन तोळ्यांची अंगठी दिली नाही, तू मला पसंत नाहीस, तुझे वडील सेंट्रिंगचे काम करतात, त्यांची मला लाज वाटते’, असे बोलून पती तेजस याने श्रुतिका यांचा वारंवार अपमान केला.
याशिवाय, डोळ्यांच्या उपचारासाठी लागणारे पैसे आणि स्वतःच्या नेट कॅफे दुरुस्तीकरिता माहेरून १ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी श्रुतिका यांच्याकडे करण्यात आली. माहेरहून पैसे आणले नाहीत, या कारणावरून संशयितांनी श्रुतिका यांना वारंवार मारहाण व शिवीगाळ केली, तसेच अन्न-पाण्यावाचून उपाशी ठेवून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर श्रुतिका पाटील यांनी आष्टा पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणी आष्टा पोलिस संशयितांवर गुन्हा दाखल करून अधिक तपास करीत आहेत.