गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गजबजली 
सांगली

Sangli News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ गजबजली

सांगलीत गणरायांच्या आगमनासाठी प्रचंड उत्साह

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : सोमवारी होणाऱ्या लाडक्या श्री गणरायाच्या आगमनाची उत्सुकता आता ताणली गेली असून, या पार्श्वभूमीवर संपूर्ण सांगली शहर आणि परिसर गणेशमय झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या खरेदीसाठी भाविकांची मोठी घाईगडबड पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या उत्साही स्वागतासाठी शहरातील मुख्य बाजारपेठ विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू, फुले, पूजेचे साहित्य आणि नयनरम्य गणेशमूर्तींनी पूर्णपणे गजबजून गेली असून ग्राहकांची खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे.

शहरातील दत्त मारुती रोड, हरभट रोड, कापड पेठ, गणपत पेठ, स्टँड रोड आणि गावभाग यांसारख्या प्रमुख व्यापारी भागांमध्ये सकाळपासूनच पादचारी आणि वाहनांची तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते आणि नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाला घरी व मंडपात आणण्यासाठी लागणाऱ्या तयारीला अंतिम रूप देत आहेत. बाजारपेठेत ठिकठिकाणी सजलेल्या स्टॉल्सवर पर्यावरणपूरक शाडूच्या मूर्तींबरोबरच सुबक आणि आकर्षक मोठ्या मूर्तींना भाविकांकडून विशेष पसंती दिली जात आहे.

सजावटीच्या साहित्यामध्ये यंदा इको-फ्रेंडली (पर्यावरणपूरक) वस्तूंना मोठी मागणी आहे. दुकानांमध्ये रंगीबेरंगी मखर, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईच्या माळा, सुंदर तोरणे आणि डिझायनर साहित्याची मोठी रेलचेल दिसून येत आहे. याशिवाय पूजेसाठी लागणारे साहित्य, ताजी फळे, दुर्वा, विविध प्रकारची फुले आणि हारांच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारात प्रचंड गर्दी केली आहे. व्यापारी आणि दुकानदारांकडूनही ग्राहकांचा हा वाढता प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले जात असून संपूर्ण शहरात एका वेगळ्याच आनंदी व उत्साही वातावरणाची निर्मिती झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT