सांगली : रंगोत्सव साजरा करण्यासाठी रविवारी (दि. 8) होणाऱ्या रंगपंचमीसाठी हातोडा, त्रिशूल, बॅट आदी पिचकाऱ्या बाजारात आल्या आहेत. याला बच्चे कंपनीची पसंती आहे. ही माहिती रंग विक्रेते शैलेश विभुते यांनी दिली.
त्वचेसाठी हानी न पोहोचवणारे हर्बल, सेंद्रिय (ऑरगॅनिक) रंग बाजारात आले असून, यालाही चांगली मागणी आहे. बाजारपेठेत रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंग विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. रासायनिक घातक रंगांऐवजी नैसर्गिक रंगाच्या विक्रीवर यंदा भर आहे. यंदा रंग आणि पिचकाऱ्यांच्या दरात सुमारे 10 टक्के वाढ झाली आहे. माती कलरचा (फक्की) दर मात्र स्थिर म्हणजे 50 रुपये पोतेच (दहा किलो) आहे. हर्बलमध्ये बारा कलर असून, याची किंमत दहा रुपयांना शंभर ग्रॅम आहे. सेेंद्रिय रंगही पंधरा रुपये पाकीट आहे. पावडर कलर यंदा नव्याने आले असून, पिचकारीमध्ये विविध रंगाची पावडर भरून ती उधळण्यात येणार आहे, त्यात पाणी नसते. लहान मुलांना आकर्षित करणारी टँक, एअर गन, बॅग स्टाइल, पाईप, स्मोक स्टील, बासरीच्या आकारातील, कार्टूनच्या अनेक पिचकाऱ्या पन्नास रुपयापासून पुढे उपलब्ध आहेत.