सांगली : चवीला आंबटगोड व रसरशीत रानमेवा जांभळे सध्या बाजारात दाखल झाली आहेत. आता सुरुवात असली तरी उत्पादन घटल्याने सध्या बाजारात जांभळांची आवक कमी आहे. त्यामुळे एक किलो जांभळांसाठी तब्बल 350 ते 400 रुपये मोजावे लागत आहेत. गतवर्षी शंभर रुपये किलो असणारी जांभळे आता जवळपास चौपट महाग झाली आहेत.
सांगलीमध्ये स्थानिकबरोबर शिराळा तालुक्यातून जांभळांची आवक होत आहे. विशेषत: मधुमेह असणाऱ्यांना जांभळे उपयुक्त असल्याचे सांगितले जात असल्याने त्यांना मागणी वाढली आहे. उन्हाळा संपत आला की जांभळांची आवक सुरू होते. डोंगरचा रानमेवा म्हणूनही जांभळांची ओळख आहे. सांगली शहरामध्ये जांभळे विक्रीसाठी किरकोळ स्वरूपात दाखल झाली आहेत. सध्या सफरचंदाचा दर 150 ते 180 रुपये किलो आहे. जांभळांची आवक वाढेल तसे दर कमी होण्याची शक्यता आहे. शहरात सध्या तासगाव आणि शिराळा तालुक्यातून जांभळे विक्रीसाठी आली आहेत.
शहरात जांभळे विक्रीसाठी आलेली महिला सुनीता माने म्हणाल्या, चार-पाच दिवसापासून आम्ही जांभळे विक्रीसाठी आणत आहोत. यंदा उत्पादन कमी आणि मागणी अधिक असल्यामुळे दर वाढले आहेत.