सांगली : दसऱ्याला आवक वाढल्याने रस्त्यावर सोडून द्याव्या लागलेल्या झेंडूच्या फुलांना दिवाळीत मात्र चांगलाच भाव मिळाला. मागणी वाढल्याने सायंकाळी झेंडूचे दर प्रति किलो १५० रुपयांवर पोहोचले. ऐन पूजेच्या वेळी शहरात झेंडूचा तुटवडा जाणवला.
झेंडूच्या फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने, बाजारपेठेत रविवारी सकाळपासून झेंडूच्या फुलांची मोठी आवक झाली होती. सकाळी ५० ते ६० रुपये किलो असलेला दर सायंकाळी सहा वाजता दीडशे रुपये किलो झाला. बहुतांशी ठिकाणी विक्रेत्याकडील झेंडूची फुले संपली. झेंडूला चांगला दर मिळाल्याने उत्पादकांमध्ये समाधान दिसून आले.
शहरामध्ये सकाळी दहापासूनच दत्त-मारुती रोड, कापड पेठ, शिवाजी मंडई, विश्रामबाग चौक, चांदणी चौक परिसरात फूल उत्पादकांनी फुलांचे ढीग मांडले होते. शहरात नांद्रे, आष्टा, बेळंकी, आरग, बेडग याबरोबरच कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर फुले विक्रीला आणली होती.
झेंडूच्या फुलांची आवक वाढल्यामुळे दरात किरकोळ वाढ झाल्याचे पहायाला मिळाले. सकाळी मोठी आवक झाल्यामुळे बाजारात झेंडूचे दर प्रति किलो साधारणपणे ५० ते ७० रुपये दरम्यान राहिले. काही ठिकाणी पिवळा झेंडू ५० ते ६० रुपये आणि केशरी झेंडू ४० ते ५० रुपये प्रति किलोने विकला जात होता. मागणी वाढू लागल्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत होेते.