आष्टा : मर्दवाडी (ता. वाळवा) येथील मळी भागात शुक्रवारी (दि. २८) दुपारी अचानक लागलेल्या भीषण आगीत सुमारे १० ते १५ एकर ऊस जळून खाक झाला. ग्रामस्थ व तरुणांनी वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मर्दवाडी येथील मळी परिसरात दुपारी एका उसाच्या फडाला अचानक आग लागली. सोसाट्याचा वारा असल्यामुळे आग वेगाने पसरत गेली आणि लगतच्या शेतांनाही तिने कचाट्यात घेतले. घटनेचे गांभीर्य ओळखून मर्दवाडीतील ग्रामस्थ आणि तरुणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
आगीत दीपक देशमुख, तानाजी देशमुख, बजरंग देशमुख, सतीश पाटील, अशोक पाटील तसेच आष्टा येथील चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ऊसशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.