शिराळा शहर : आता आंबा हंगाम हाता-तोंडाशी आला असताना बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सततचे ढगाळ वातावरण, सकाळ-संध्याकाळ पडणारे दाट धुके आणि अवेळी पावसामुळे आंबा बागांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. यामुळे आंबा उत्पादनावर संकट ओढवले असून शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, मोहर आल्यानंतर वातावरणातील आर्द्रता वाढल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रसार जलदगतीने होत आहे. त्याचबरोबर तुडतुडे, थ्रिप्स आणि इतर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने मोहर गळून पडत आहे. परिणामी फळधारणा कमी होत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिराळा, रिळे, कापरी, रेड, खेड या परिसरात मोठ्या प्रमाणावर आंब्याच्या बागा आहेत. शेकडो एकर क्षेत्रावर आंबा लागवड आहे. मात्र गेल्या काही दिवसांतील बदलत्या हवामानामुळे मोहरावर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. योग्यवेळी उपाययोजना न केल्यास उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. आगाप मोहर आलेल्या झाडांना कैऱ्या लागण्यास सुरुवात झाली आहे. पोषक हवामान व चांगल्या मोहरामुळे काही तरी पदरात पडेल, या अपेक्षेने आंबा बागायतदार समाधानी होते.
शिराळा येथील आंबा उत्पादक सुदीप शिंदे म्हणाले, गेल्या महिनाभरात वातावरणात सातत्याने होत असलेले बदल, धुके व वाढलेली आर्द्रता यामुळे आंबा मोहर व फळे गळण्यासह किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. त्यातच पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने अजून नुकसान होण्याची शक्यता आहे.