Sangli Electric Shop Fire 
सांगली

Sangli Electric Shop Fire : मांगलेत इलेक्ट्रिक दुकानास शॉर्टसर्किटने आग

साहित्य खाक; कोट्यवधींचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

मांगले : मांगले (ता. शिराळा) येथील बसस्थानक परिसरातील शिवाजी वाचनालयाशेजारी असलेल्या ‘किरण लाईट हाऊस’ या इलेक्ट्रिक व हार्डवेअर दुकानाला सायंकाळी पाचच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत कोट्यवधीचे हार्डवेअर, इलेक्ट्रिक व शेतीविषयक साहित्य तसेच रंगांचे डबे जळून खाक झाले. पावणेदोन तासाच्या अथक्‌ प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या तीन वाहनांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.

अमोल आनंदा चौगुले यांच्या मालकीच्या या दुकानात सायंकाळी पाचच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. दुकानात रंगांचे डबे, प्लास्टिक आणि इलेक्ट्रिक साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरात धुराचे लोट पसरले. आगीची तीव्रता वाढत असताना दुकान मालक अमोल चौगुले हे धाडसाने बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच विश्वासराव नाईक साखर कारखाना, तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि शिराळा नगरपंचायत यांच्या अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून पावणेदोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे शेजारील दुकाने आणि घरांचे नुकसान टळले. आग आटोक्यात आल्यानंतर शेजारच्या दुकानातील दोन गॅस सिलिंडर सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

आगीमुळे मांगले-शिराळा मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास बंद ठेवण्यात आली होती. आमदार सत्यजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, ग्राम महसूल अधिकारी ए. व्ही. काकरवाल आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT