तासगाव : मणेराजुरी (ता. तासगाव) येथे किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयता, लोखंडी गज आणि बिअरच्या बाटल्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. बुधवार, दि. 18 रोजी सकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात गुरुप्रसाद हणमंत पवार (वय 21, रा. काळढोह वस्ती, मणेराजुरी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी माजी सभापतींसह 10 जणांविरुद्ध तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी मणेराजुरी-सांगली रस्त्यावरील खंडोबाचा ओढा येथे फिर्यादीचे वडील हणमंत पवार यांना संशयित विशाल जमदाडे, संकेत जमदाडे आणि आदित्य जमदाडे यांनी विनाकारण शिवीगाळ व मारहाण केली होती. या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गुरुप्रसाद पवार हा सायंकाळी 5 वाजता मणेराजुरी बस स्थानकाजवळील एका बारसमोर संशयित विशालचे वडील संजय जमदाडे यांना भेटण्यासाठी गेला होता. जाब विचारत असताना गुरुप्रसाद आणि संजय जमदाडे यांच्यात जोरदार वाद झाला. यावेळी संजय जमदाडे यांनी आपला मुलगा विशाल आणि इतर संशयितांना बोलावून घेतले. जमलेल्या जमावाने गुरुप्रसादला जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता, लोखंडी गज, काठ्या, विटा आणि बिअरच्या बाटल्यांनी बेदम मारहाण केली. डोक्यावर आणि शरीरावर वर्मी घाव लागल्याने गुरुप्रसाद रक्ताच्या थारोळ्यात पडला.
या प्रकरणी विशाल संजय जमदाडे, दयानंद काकासाहेब जमदाडे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय जालिंदर जमदाडे, रितेश रावसाहेब पाटील, संकेत प्रवीण जमदाडे, राहुल संजय जमदाडे, लक्ष्मीकांत सूर्यकांत जमदाडे, सागर साहेबराव जमदाडे, आदित्य सुरेश जमदाडे व अतुल नारायण जमदाडे (सर्व रा. मणेराजुरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल टकले आणि उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. हा हल्ला मुख्य रस्त्यावर झाल्याने मणेराजुरीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. जखमी गुरुप्रसादवर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तासगाव पोलिस अधिक तपास करत आहेत.