सांगली : ‘जत बसस्थानकावर सोडतो’ असे सांगून महिलेला निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवून बलात्कार आणि लूटमार करणाऱ्या मुनीर खुतबुद्दीन नदाफ (वय ५१, रा. जत) याला २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सांगलीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. ए. मोहंती यांनी हा निकाल दिला.
खटल्याची पार्श्वभूमी अशी : पीडित महिला २६ सप्टेंबर २०१९ रोजी जत तालुक्यातील एका गावातून जत येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपी मुनीर नदाफ हा चारचाकी घेऊन आला. त्याने जत बसस्थानकावर सोडतो असे सांगितल्याने महिलेने विश्वासाने गाडीत प्रवेश केला. मात्र, वाटेत निगडी गावच्या हद्दीत पवनचक्कीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गाडी नेऊन त्याने चाकूचा धाक दाखवला. तेथे महिलेवर अत्याचार करून तिची कर्णफुले, साखळी, बुगड्या आणि मोबाईल असा मुद्देमाल काढून घेतला व जीवे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले.
पीडितेने तत्काळ जत पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करून आरोपी नदाफ याला अटक केली. तत्कालीन तपास अधिकारी एस. जी. मोहिते आणि दिलीप जगदाळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता उज्ज्वला करवते यांनी काम पाहिले.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १८ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडिता आणि डॉक्टरांची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी नदाफ याला दोषी ठरवले. बलात्काराच्या गुन्ह्यात २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड, तर जबरदस्तीने चोरी केल्याच्या गुन्ह्यात ७ वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
दंडाची ही रक्कम पीडित महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिने साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागेल. या खटल्यात सरकार पक्षाला पैरवी अधिकारी उपनिरीक्षक संजय कापूरकर, महिला पोलिस रेखा खोत, सुनीता आवळे, सुप्रिया भोसले व तुकाराम बंडगर यांनी मदत केली.