मिरज : मिरज शहरातील मोहम्मदिया मशीदजवळ पोलिस असल्याची बतावणी करून तोतया पोलिसाने वयोवृद्ध महिलेचे 48 हजार रुपयांचे दागिने हातोहात लंपास केले. याप्रकरणी रुकैय्या इब्राहिम साबळे (वय 71, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी, रुकैय्या साबळे या शहरातील मोहम्मदिया मशिदीशेजारून निघाल्या होत्या. त्यावेळी 40 ते 50 वयोगटातील एका तोतया पोलिसाने त्यांना गाठले. ‘पुढे अपघात झाला आहे. आमचे साहेब पुढे चौकशी करीत आहेत. ते तुम्हाला विचारतील. त्यामुळे तुमच्या हातातील बांगड्या काढून द्या, मी ते कागदात बांधून देतो’, असे सांगितले.
रुकैय्या यांनी सोन्याच्या बांगड्या तोतया पोलिसाकडे काढून दिल्या. त्यानंतर संबंधिताने हातचलाखी करून बनावट बांगड्या कागदात गुंडाळून दिल्या. त्यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येतात रुकैय्या साबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.