कुपवाड : पाच ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे वेढण (अंगठी) खरे असल्याचे भासवून ते गहाण ठेवत एका सोनाराची ५७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिस ठाण्यात संशयितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
नितीन दगडू वाघमोडे (रा. यशवंतनगर, कुपवाड) असे फसवणूक झालेल्या सोनाराचे नाव असून, जैद इकबाल शेख (रा. खणभाग, सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. वाघमोडे यांचे कुपवाड येथील बसस्थानकाजवळ 'श्री सिद्धनाथ ज्वेलर्स' नावाने सोने-चांदीचे दुकान आहे. ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास संशयित जैद शेख दुकानात आला. त्याने आपले नाव 'जावेद शेख' (रा. इनामदार हॉल, कुपवाड) असे खोटे सांगून ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेढण गहाण ठेवण्यास दिले. तसेच मोबाईलमध्ये सोन्याची खरेदी पावतीही दाखवली. वाघमोडे यांनी संशयितावर विश्वास ठेवून त्याला ५७ हजार रुपये रोख दिले. दुसऱ्या दिवशी, ५ ऑगस्ट रोजी वाघमोडे यांनी सांगलीतील सराफ बाजारातील 'श्री बालाजी टंच' येथे कॉम्प्युटरवर त्या वेढणाची तपासणी केली असता, ते बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाघमोडे यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल केला आहे.