पलूस : कांद्याचे पोते डोक्यावरून घेऊन जात असताना अचानक पाय घसरून खाली पडल्याने विपुल शिवाजी गोंदिल (वय ४५, रा. पलूस) यांचा मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. ही घटना गुरुवारी (दि. ८) सायंकाळी घडली.
पलूस पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपुल गोंदिल हे पलूस येथे घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते कांद्याचे पोते डोक्यावरून घेऊन जात असताना अचानक पाय घसरून खाली पडले. या यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. हा प्रकार लक्षात येताच चुलत भाऊ आकाश गोविंद गोंदिल यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी पलूस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीवरून पलूस पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी तालुका कार्यकारी दंडाधिकारी, पलूस यांच्याकडे अहवाल पाठवण्याची कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विपुल गोंदिल यांच्या पश्चात पत्नी, आई व दोन मुले असा परिवार आहे. गोंदिल यांच्या आकस्मिक निधनाने पलूस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.