सांगली : महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच सोमवारी जलवाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. मुख्य चौकात भारती भवनसमोर जलवाहिनी फुटली असून, डांबरी रस्त्याला पाण्याचे उमाळे फुटले आहेत. वर्दळीच्या रस्त्यावरच गळती लागल्याने दुरुस्तीचे आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर आहे. तब्बल ७० ते ८० वर्षे जुन्या असलेल्या या जलवाहिनीचे आवश्यक सुटे भाग बाजारात उपलब्ध नसल्याने ते नव्याने तयार करून घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे दुरुस्तीला विलंब लागण्याची शक्यता आहे.
येथील राजवाडा चौकातून महापालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर भारती विद्यापीठासमोर ही जलवाहिनी १० ते १२ फूट खोल आहे. सुमारे ४५० ते ५०० मि.मी. व्यासाची ही जलवाहिनी असून, ती जुन्या जलवाहिन्यांपैकी एक आहे. मुख्य रस्त्यावरच जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी वाहतूक शाखेचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. वाहतूक बंद करण्यास परवानगी मिळाल्यास मंगळवारपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी राजवाडा चौक ते शहर पोलिस स्टेशनपर्यंत एका बाजूचा रस्ता बंद ठेवावा लागणार आहे.
आव्हानात्मक काम
अनेक वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या या जलवाहिनीचे सुटे भाग सध्या बाजारात सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आवश्यक भाग नव्याने तयार करून घ्यावे लागणार आहेत. सोमवारी सायंकाळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी ए. एच मुलाणी व कर्मचाऱ्यांनी गळतीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रोकडे यांच्याशी चर्चा केली. जलवाहिनी दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरणार आहे.