सांगली : येथील वखारभागातील दांडेकर कंपाउंड परिसरातील गणपती फर्निचरच्या गोदामाला सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदामातील फर्निचर साहित्य आणि एक मालवाहतूक वाहन जळून खाक झाले. आगीने शेजारील कुमार ट्रेड सेंटर या तळमजला अधिक तीनमजली इमारतीलाही विळखा घातला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
गणपती फर्निचरचे मालक रसिकलाल पटेल यांच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. गोदामात फर्निचर साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पहाटे पाच वाजता माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी विभागाची सहा वाहने आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच कुपवाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे एक वाहन व इतर अतिरिक्त वाहने मिळून एकूण नऊ अग्निशमन वाहनांच्या मदतीने जवानांनी पाण्याचा मारा सुरू केला.
महापालिकेचे अग्निशमन विभाग प्रमुख भागवत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली अठरा कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन तासांच्या अथक् प्रयत्नांनंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. दरम्यान, गोदामाशेजारील कुमार ट्रेड सेंटर इमारतीत पसरलेली आग रोखण्यातही जवानांना यश आले. या घटनेत गोदामातील फर्निचर साहित्याचे मोठे नुकसान झाले असून, मालवाहतूक वाहनही आगीत जळून खाक झाले.
अग्निशमन विभाग अधिक सक्षम करावा : ठोकळे
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. महापालिका क्षेत्रात अलीकडच्या काळात आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाल्याने, आपत्कालीन वेळी तातडीने मदतकार्य राबवण्यासाठी अग्निशमन विभाग अत्याधुनिक यंत्रणा, पुरेशी वाहने आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची भर घालून अधिक सक्षम करणे गरजेचे असल्याची मागणी नगरसेवक ठोकळे यांनी केली आहे.