बुधगाव : बुधगाव-माधवनगर रस्त्यावरील ओढापात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तहसीलदार मिरज यांचे मनाई आदेश असतानाही हे काम सुरू असल्याने, ही अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांच्यावतीने अनिल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
काननवाडी, सावळी व कुपवाड एमआयडीसी भागातून नैसर्गिक उताराने येणारे पावसाचे पाणी माधवनगरमार्गे ओढ्यातून पुढे कृष्णा नदीला जाऊन मिळते. मात्र, माधवनगर हद्दीत या ओढापात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत आहेत. याबाबत तक्रार झाल्यानंतर २५ मे २०१७ रोजी मिरज तहसीलदारांनी अतिक्रमणे हटवून ओढापात्र खुले करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, प्रशासनाचे हे आदेश धुडकावून ओढापात्रात टोलेजंग इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळे पावसाचे पाणी नागरी वस्तीत शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून परिसरातील शेतीचेही मोठे नुकसान होत आहे. तसेच पावसाळ्यात पाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक वारंवार ठप्प होते. त्यामुळे महापालिका व महसूल प्रशासनाने हे अतिक्रमण तातडीने हटवून ओढा मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.