सांगली : संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माधवनगर येथे बसवराज उर्फ बश्या कल्लाप्पा अडकाई (वय ३०, रा. अहिल्यानगर झोपडपट्टी, सांगली) या तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. माधवनगर येथील जुन्या कॉटन मिलजवळ सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. विश्वजित दीपक लोंढे (रा. रविवार पेठ, माधवनगर) व सौरभ सोमनाथ नलावडे (रा. अहिल्यानगर) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बसवराज आणि त्याचे मित्र विश्वजित व सौरभ जुन्या कॉटन मिलजवळ आले होते. त्यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. सोमवारी रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला. या वेळी बसवराज हा नशेत होता. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दोघांनी धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर आणि पोटावर वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बसवराज याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा केला. या वेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बसवराज याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली,
मृत बसवराज याच्याविरोधात कुपवाड पोलिस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, हा खून नेमक्या कोणत्या कारणावरून झाला, याबाबत पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.
पोलिसांची धावाधाव
गणेशोत्सवात सोमवारी गणेश प्रतिष्ठापनेचा दिवस असल्याने सर्वच पोलिस बंदोबस्तात व मिरवणुकीच्या कामात व्यस्त होते. माधवनगर येथे खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयितांना शोधण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच
सांगली जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत ५० हून अधिक खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे व खुनांच्या सत्रामुळे पोलिसांच्या कामगिरीबाबत विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षातील नेत्यांमधूनही सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यातच सोमवारी आणखी एक खून झाल्याने खळबळ उडाली आहे.