माधवनगर येथे वृद्धेचे दागिने चोरणाऱ्यास अटक  
सांगली

Sangli jewelry theft : माधवनगर येथे वृद्धेचे दागिने चोरणाऱ्यास अटक

चोरटा कोल्हापूरमधील; चोरीतील दागिने हस्तगत करण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथे वृद्धेचे दागिने चोरणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दस्तगीर गुलाब शेख (वय 44, रा. शाहू कॉलनी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून वृद्धेचे एक लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.

फिर्यादी विनायक जाधव यांची आजी दि. 29 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास एका ठिकाणी कामासाठी गेली होती. त्यानंतर त्या घरी परतत होता. त्यावेळी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एकाने त्यांना दुचाकीवर बसवले. त्यानंतर एका बँकेसमोर तो त्यांना घेऊन आला. त्यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी जायचे आहे, तुमच्या गळ्यातील दागिने काढून ठेवा, असे सांगितले. वृद्धा गळ्यातील दागिने काढत असताना दागिन्याला हिसडा मारून त्याने पलायन केले होते. दरम्यान, याबाबत तपास करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. त्यांचे पथक तपास करीत असताना संबंधित चोरटा अंकली येथील धनश्री लाकडी कला-क्रीडा केंद्राजवळ येणार असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा लावला होता.

जयदीप कळेकर यांचे पथक त्या ठिकाणी असताना दस्तगीर शेख हा त्या ठिकाणी आला. पथकाने त्याच्यावर छापा टाकून त्यास अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात दागिने मिळून आले. अधिक चौकशी केली असता, त्याने माधवनगर येथे वृद्धेचे दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमध्ये सहायक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह अभिजित माळकर, ऋषिकेश सदामते यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT