जत : माडग्याळ (ता. जत) येथील बुध्याळ वस्ती परिसरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन एकर डाळिंब बाग जळून खाक झाली. ही घटना सोमवार, दि. 9 रोजी सायंकाळी घडली.
बुध्याळ वस्ती येथील अर्चना माळी यांची गट क्र. 100/2 मध्ये दोन एकर क्षेत्रात डाळिंब बाग आहे. परिसरातील विद्युत रोहित्रामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ठिणगी उडाल्याने या डाळिंब बागेला आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.आगीत डाळिंबाची सुमारे 600 झाडे जळून खाक झाली. तसेच शेतातील झोपडी, वीज वायर, पाईपलाईन व मोटर जळाल्याने मोठे नुकसान झाले. घटना लक्षात येताच अर्चना माळी व अंबाना माळी यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने संपूर्ण डाळिंब बाग जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच तलाठी अभिजित गाडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.