सांगली : मांगले ते कोडोली मार्गावर मध्यरात्री दोनच्या सुमारास वारणा नदीजवळील खामकर वस्तीनजीक अचानक पूर्ण वाढ झालेला बिबट्या वाहनासमोर आल्याची घटना घडली. त्यामुळे रात्रीच्यावेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांगले येथील संजय सदाशिव शेवडे यांच्या तळसंदे येथील नातेवाईकाचे निधन झाले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून ते मध्यरात्री मोटारीतून घरी परतत होते. वारणा नदी ओलांडल्यानंतर खामकर वस्तीजवळ पोहोचताच वाहनाच्या प्रकाशात रस्त्याच्या मधोमध बिबट्या उभा असल्याचे त्यांना दिसले. चालकाने वाहन तत्काळ थांबवले. वाहनाच्या प्रकाशामुळे बिबट्या काही काळ रस्त्याच्या मध्यभागीच थांबला. त्यानंतर रस्ता ओलांडून पसार झाला.
बेडगमध्ये बिबट्याचे दर्शन
बेडग (ता. मिरज) गावातील मालगाव रस्ता ते मल्लेवाडी रस्त्यावरील कळंबी कालव्यावर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका कार्यक्रमाची भांडी घेऊन ‘छोट्या टेम्पोतून जात असलेल्या चालकाला कालव्यावरून जात असलेला बिबट्या दिसला. चालकाने बिबट्याचे चित्रीकरण केले.
आष्ट्यात शेळी ठार
येथील खोत मळा परिसरातील सरदार नायकवडी यांच्या जनावरांच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना गुरुवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. रविवारी (दि. ९ ऑगस्ट) येथील सर्वोदय सहकारी साखर कारखाना मार्गावरील अडतूर वाट परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शुभम ढोले यांचा घोडा जागीच ठार झाला होता. यानंतर वन विभागाने शेतकऱ्यांना जनावरांची शेड पूर्णपणे बंदिस्त करण्याचे आवाहन केले होते.
वांगीत वासरावर हल्ला; कुत्र्यांचा फडशा
कडेगाव तालुक्यातील वांगी गावाच्या उत्तरेस असलेल्या सुतार व माळी मळ्यात बिबट्याने दोन पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले. ताकारी मुख्य कालव्यालगत पोपट माळी यांच्या घराजवळ गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
याच परिसरातील संजय शामराव वडार यांच्या वस्तीवरील वासरावरही बिबट्याने हल्ला केला. मात्र, घरातील व्यक्तींनी तत्काळ बिबट्याला हाकलून लावले. आठ दिवसांपूर्वी गावाच्या पश्चिमेस असलेल्या फडीमळा येथे अशोकराव आबा यांचा साखळीने बांधलेला कुत्रा बिबट्याने उचलून नेला होता.