Leopard Sighting Pudahri
सांगली

Sangli News : शेडगेवाडी बाजारपेठेत बिबट्याची दहशत

भरदिवसा शाळेत दिसल्याने भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

कोकरूड : शेडगेवाडी (ता. शिराळा) येथील मुख्य बाजारपेठेसह परिसरात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सुरू आहे. सोमवारी चक्क मातोश्री हिराई देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आवारातील एका खोलीत भरदिवसा बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली. बाजारपेठेत बिबट्याने पाळीव व भटक्या कुत्र्यांना भक्ष्य बनविल्यामुळे ग्रामस्थ, व्यापारी आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली असून वन विभागाने तातडीने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सोमवारी सकाळी विद्यालय सुरू असताना उत्तरेकडील एका खोलीतून आवाज येत असल्याने कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला. त्यावेळी आत बिबट्या बसलेला दिसून आला. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ तेथून पळ काढला; त्यानंतर बिबट्या खोलीबाहेर पडून निघून गेला.

गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा बाजारपेठेत वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत स्पष्ट कैद झाले आहे. वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे व रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

शेडगेवाडीमध्ये मोठी लोकवस्ती असून विद्यालय, बाजारपेठ आणि रहिवासी परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. अशा ठिकाणी बिबट्याचा वावर सुरू असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

चार दिवसात बिबट्याच्या हालचाली

  • बाजारपेठेत दिवसा व रात्री मुक्तसंचार

  • पाळीव व भटक्या कुत्र्यांचा फडशा

  • पडक्या घरात बिबट्याचा मुक्काम

  • विद्यालयातील खोलीत भरदिवसा दर्शन

  • सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत हालचाली कैद

  • विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT