कोकरूड : येथील माने गल्ली परिसरात शनिवारी मध्यरात्री बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून त्याचा फडशा पडल्याची घटना घडली. रविवारी सकाळी रस्त्यावर व फरशीवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. भरवस्तीतच ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने माने गल्ली परिसरात प्रवेश करून एका कुत्र्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याचा फडशा पाडला. मात्र, सकाळी घटनास्थळी कुत्र्याचे अवशेष अथवा मृतदेह आढळून आले नाहीत. रस्त्यावर आणि फरशीवर रक्ताचे डाग दिसून आल्याने नेमकी काय घटना घडली असावी, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात भेट देऊन पाहणी केली. यावेळी घटनास्थळावरील पायांच्या ठशांची तपासणी केली असता ते बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे माने गल्ली परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे.
कोकरूड गावाच्या भरवस्तीत बिबट्याने रात्रीच्या वेळी शिरकाव करून कुत्र्याची शिकार केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे, लहान मुले व पाळीव प्राण्यांची सुरक्षितता याबाबत नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
वन विभागाने या परिसरात बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, आवश्यक त्या ठिकाणी गस्त वाढवावी तसेच नागरिकांना सतर्कतेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे. बिबट्याचा वावर लक्षात घेता नागरिकांनीही रात्रीच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.