Leopard Pudhari
सांगली

Sangli Leopard Terror : कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या थेट घरात

आंधळीत कुरणमळा परिसरात थरार तर ऐतवडे खुर्द येथे काळ्या बिबट्याचा धुमाकूळ

पुढारी वृत्तसेवा

आंधळी : पाळीव कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या थेट घरात घुसला. आंधळी (ता. पलूस) येथील कुरणमळा परिसरात जयसिंग यशवंत माने यांच्या घरात ही घटना सोमवारी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास घडली. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला. मात्र, या घटनेमुळे माने कुटुंब भयभीत झाले असून, संपूर्ण आंधळी गावात व परिसरात भीतीचे वातावरण आहे.

जयसिंग माने, त्यांच्या पत्नी व नात घरात होते. दरम्यान, पाळीव कुत्रा अचानक मोठ्याने भुंकत घरात पळाला. त्याच्यापाठोपाठ बिबट्याही थेट घरात शिरला. हा प्रकार लक्षात येताच घरातील सर्वांचीच भीतीने गाळण उडाली. त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून बिबट्या घराबाहेर पळून गेला. घाबरलेल्या माने कुटुंबीयांनी शेजारील नागरिकांना फोन करून बोलावून घेतले. शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबाला आधार दिला. आंधळी परिसरातील आनंदमळा, कुरणमळा, कुंभारवस्ती, काजळगोठी आणि फलटणकर वस्ती या भागात यापूर्वीही बिबट्याचे दर्शन झाले होते.

कुत्र्यांचा, वासरांचा फडशा : बंदोबस्ताची मागणी

वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील नदीकाठ परिसरात काही महिन्यांपासून दुर्मीळ काळ्या बिबट्यासह तीन बिबट्यांचा मुक्त वावर सुरू आहे. या बिबट्यांनी परिसरातील कुत्रे आणि शेतातील गोठ्यांमधील वासरांचा फडशा पाडला आहे. थेट लोकवस्तीजवळ बिबट्यांचे दर्शन होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

बिबट्या काही महिन्यांपासून ऐतवडे खुर्द शिवारातील पवार वस्ती, मुग्धमी आणि पर्वतवाडी आदी लोकवस्तीच्या परिसरात दिसत आहे. या बिबट्यांनी परिसरातील अनेक पाळीव कुत्र्यांना आणि जनावरांच्या वासरांना शिकार बनवले आहे. या वस्त्यांवर सुमारे ५०० हून अधिक नागरिकांची वस्ती आहे. शालेय विद्यार्थी दररोज याच मार्गाने ये-जा करतात. परिसरात ऊस क्षेत्र असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT