Leopard Attack Pudhari
सांगली

Sangli Leopard Attack: बिबट्याचा सरपंचावर हल्ल्याचा प्रयत्न

शेडगेवाडी फाटा येथील घटना; वन विभागाला चकवा देत पलायन

पुढारी वृत्तसेवा

कोकरूड : शेडगेवाडी फाटा (ता. शिराळा) येथील शेडगेवाडी-कराड मार्गावरील नागरी वस्तीत शुक्रवारी (दि. २८) दुपारी दोन ते चारच्या सुमारास बिबट्या शिरल्याने परिसरात थरार निर्माण झाला. बाजारपेठेतील शरद पाटील यांच्या घराजवळील बागेत बिबट्या दिसल्याने नागरिकांची गर्दी झाली. सरपंच तानाजी नाटूलकर नागरिकांना दूर राहण्याच्या सूचना करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने दाट झाडीत धाव घेतली.

वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. बागेला तारेचे कुंपण असल्याने बिबट्याला बाहेर पडता येत नव्हते. पथकाने ड्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध घेतला. मात्र, दाट झुडपांमध्ये लपल्याने बिबट्याचे ठिकाण स्पष्ट झाले नाही. रेस्क्यू टीम बागेत प्रवेश करताच बिबट्याने अचानक उंच झाडावर चढून बागेच्या बाहेर उडी मारली आणि डोंगराच्या दिशेने धूम ठोकली.

महिनाभरापासून वावर

शेडगेवाडी परिसरात महिनाभरापासून बिबट्याचा नागरी वस्तीत वावर वाढला आहे. वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बाजारपेठेतील घरांच्या परिसरातच बिबट्या आल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

विद्यार्थ्यांसह शेतकरीही धास्तावले

बिबट्याच्या वावरामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनाही शेतीची कामे व जनावरांची देखभाल करण्यासाठी जीव मुठीत घेऊन शेतात जावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT