Leopard Pudhari
सांगली

Sangli Leopard attack: ऐतवडेत बिबट्याच्या हल्ल्यात सात मेंढ्या ठार

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील माळवाडी भागात शुक्रवारी पहाटे बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवून पाच मेंढ्या जागीच ठार केल्या

पुढारी वृत्तसेवा

ऐतवडे खुर्द : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील माळवाडी भागात शुक्रवारी पहाटे बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला चढवून पाच मेंढ्या जागीच ठार केल्या, तसेच दोन मेंढ्या घेऊन धूम ठोकली. या भीषण हल्ल्यामुळे परिसरात कमालीची भीती पसरली असून वन विभागाने तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.

येथील मेंढपाळ प्रकाश बर्गे यांची मेंढरे त्यांच्या घराजवळील तळावर बसवण्यात आली होती. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास प्रकाश बर्गे हे नेहमीप्रमाणे मेंढरांच्या तळावर गेले असता, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावेळी लहान-मोठ्या पाच मेंढ्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले. बर्गे हे मेंढपाळ व्यवसायावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एकाच रात्रीत सात मेंढ्या गमावाव्या लागल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये बिबट्याची दहशत पुन्हा निर्माण झाली आहे. ‘आज मेंढ्यांवर हल्ला झाला आहे, उद्या तो माणसांवर झाला तर याला जबाबदार कोण?’ असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. वन विभागाने पीडित मेंढपाळ प्रकाश बर्गे यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT