बिऊर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार 
सांगली

Sangli leopard attack : बिऊर ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

नरभक्षक बिबट्याला ठार मारा; ग्रामस्थांची आक्रमक भूमिका

पुढारी वृत्तसेवा

शिराळा शहर : बिऊर (ता. शिराळा) येथे शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी बिबट्याने केलेल्या भीषण हल्ल्यात राजवीर हणमंत पाटील या 6 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद बिऊर व परिसरात उमटले असून, संतप्त ग्रामस्थांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. नरभक्षक बिबट्याला ठार मारावे आणि संबंधित वनक्षेत्रपालांवर गुन्हा दाखल करावा, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी मांडली आहे.

शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास राजवीरवर बिबट्याने हल्ला केला. त्यापूर्वी साधारण पाऊण तास आधी कदमवाडी हद्दीतील माळावर ट्रॅक्टर चालक दत्तात्रय पाटील यांना बिबट्या दिसला होता. त्यांनी गावाला सावधही केले होते, मात्र दुर्दैवाने सातच्या सुमारास राजवीर या बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरला. शनिवारी सकाळी उपवळे येथेही पृथ्वीराज पाटील या तरुणावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्या पसार झाला. तोच हा नरभक्षक बिबट्या असावा, असा दाट संशय ग्रामस्थांनी व्यक्तकेला आहे.

प्रशासनाविरुद्ध संतापाचा उद्रेक

बिऊर येथे झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील यांनी या घटनेला प्रशासनाचा खून संबोधले असून केवळ आर्थिक मदत देऊन गेलेला मुलगा परत येणार नाही, अशी भावना व्यक्त केली. जोपर्यंत आमची दखल घेतली जात नाही, तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा बिऊर आणि उपवळे ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामस्थ प्रकाश पाटील आणि शहाजी पाटील यांनी वनविभागाच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. जनावरे हद्दीत गेल्यास कारवाई करणारे वनविभाग आता मानवी जीव गेल्यावर कुठे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT