सांगली : महापालिकेने 2019 ते 22 या कालावधीत संस्था, ट्रस्ट, व्यक्तींना विकसित करण्यासाठी 24 भूखंड दिले आहेत. त्यांच्याकडून या भूखंडांचा विनामोबदला वापर सुरू आहे. या भूखंडांच्या खिरापतीची चौकशी करावी. महापालिकेने हे भूखंड ताब्यात घ्यावेत अथवा संबंधितांशी बाजारभावानुसार भाडेकरार करून ते वापरण्यास द्यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेविका आरती वळवडे यांनी केली आहे.
आरती वळवडे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महापालिकेने 2019 ते 22 या कालावधीत महापालिका क्षेत्रातील 24 भूखंड हे काही संस्था, ट्रस्ट, खासगी व्यक्तींना चुकीच्या पद्धतीने वापरण्यास दिले आहेत. महापालिका अधिनियम 79 (ड) अन्वये मोबदला घेणे आवश्यक आहे. महापालिकेच्या मालकीची कोणतीही स्थावर मालमत्ता किंवा कोणताही हक्क विकता येईल, भाडेपट्ट्याने देता येईल किंवा हस्तांतर करता येईल, तो मोबदला किंवा असे अधिमूल्य, भाडे किंवा अन्य मोबदला हा चालू बाजार किमतीपेक्षा कमी असता कामा नये, असे अधिनियमात म्हटलेले आहे. अधिनियमानुसार मोबदला, भाडेवसुली केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल, मात्र सध्या हे 24 भूखंड कोणताही मोबदला किंवा भाडे न घेता वापरण्यास दिलेले आहेत.
गेली अनेक वर्षे संबंधित संस्था, ट्रस्ट व खासगी व्यक्तींकडून महापालिकेच्या भूखंडांचा वापर होत आहे. हे सर्व भूखंड संबंधित संस्था, ट्रस्ट, व्यक्ती यांना त्यांनी स्वखर्चाने सुशोभीकरण करण्यास दिलेले आहेत. मात्र त्यापैकी अनेक संस्था, ट्रस्टकडून हे भूखंड स्वत:च्या मालकीचे असल्याप्रमाणे वापर करत आहेत. महापालिकेच्या भूखंडांचा होत असलेला गैरवापर थांबवावा, महापालिका आयुक्तांनी हे भूखंड ताब्यात घ्यावेत अथवा बाजारभावानुसार भाडे ठरवून संबंधितांना वापरण्यास द्यावेत, अशी मागणी वळवडे यांनी केली आहे.
पार्श्वनाथ प्रतिष्ठान कुपवाड रोड अकुजनगरमधील खुला भूखंड, मिरज येथील सि.स.नं./फायनल प्लॉट नं. 11/1/7, सांगली गुलमोहोर कॉलनी येथील कृपा बंगल्याजवळील प्लॉट नंबर 12404, ‘सिनर्जी’जवळील सि.स.नं. 10247/अ हा प्लॉट, मिरज येथील सि.स.नं. 898-1/1898-1अ, मिरज ख्वाजा वस्तीजवळील शाळा नंबर 25 समोरील सि.स.नं. 93/3/ब ओपनस्पेस, मिरज सि.स.नं. 11284/40 मनपा भूखंड मिरज, सरस्वतीनगर सांगली येथील खुला भूखंड, आण्णा सातगोंडा पाटीलनगर येथील सि.स.नं. 11284/40, मिरज येथील चंदनवाडी एसटी वर्कशॉपजवळील सि.स.नं. 10247/अ, कुपवाड येथील सि.स.नं. 3630 मधील 1289.70 चौ. मी.चा महापालिकेचा ओपन स्पेस, कुपवाड पार्श्वनाथनगर येथील सि.स.नं. 152/1 ब+1 क मधील 568.60 चौ.मी.चा ओपन स्पेस, पंढरपूर रोड जुना मेंढे मळा रस्ता सर्व्हे नं. 82/2+3/335 मिरज
सि.स.नं. 2901 खंडोबा मंदिराच्या पश्चिमेस महापालिका भूखंड मिरज, मिरज भूमापन क्रमांक 203/2 श्री स्वामी समर्थ मंदिर चौक कृष्णाघाट मिरज, सर्व्हे नं. 114/2 विद्यानगर वारणाली रोड गल्ली नंबर 6 सांगली, गोमटेशनगर सर्व्हे नं. 256/ब महापालिका भूखंड, सोनारमळा हडको कॉलनी अभयनगर सांगली, वानलेसवाडी येथील भूमापन क्र. 33 मधील पूर्व बाजूची खुली जागा क्रमांक 1, सर्व्हे नंबर 33/ मनपा खुला भूखंड, खुली जागा नं. 2 ढेरेमळा वानलेसवाडी, संजयनगर येथील भूमापन क्र. 144 / खुली जागा सांगली, गट नं. 555/1ब नवीन नं. 14381/ मनपा खुला भूखंड पाचुंदेनगर सांगली, भूमापन क्रमांक 367 क+353 ओपन स्पेस क 2 क्षेत्र 1300 चौ. मी. विश्रामबाग, वानलेसवाडी येथील स. नं. 38/1 अ/2 मधील महापालिकेचा खुला भूखंड.