सांगली : पत्नीला तिच्या कथित प्रियकराशी बोलण्यासाठी मोबाईल दिल्याचा संशय घेऊन पतीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने एका मजुराचा अमानुष मारहाण करून खून केला. ही घटना शहरातील रामनगर-कलानगर परिसरात घडली. लखन भानुदास जगताप (वय ३८, सध्या रा. रामनगर, कलानगर, मूळ रा. जामवाडी, टांगा अड्डा, सांगली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी प्रशांत त्रिवेदी व त्याचा अल्पवयीन मुलगा (दोघे रा. रामनगर, सांगली) या पिता-पुत्राविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, मुख्य संशयित प्रशांत त्रिवेदी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन जगताप हे रामनगर परिसरात मजुरी करत असत. ते परिसरातच एका भाड्याच्या घरात राहत होते. संशयित प्रशांत त्रिवेदी याला आपली पत्नी तिच्या प्रियकराशी बोलण्यासाठी लखनचा मोबाईल वापरत असल्याचा संशय होता. यावरून दोघांमध्ये वाद होता. १५ ऑक्टोबररोजी रात्री ११ च्या सुमारास लखन घरासमोर थांबले असताना संशयित बाप-लेकाने त्यांना गाठले. त्यांना जाब विचारत शिवीगाळ केली आणि ‘तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत जमिनीवर पाडून छातीवर व पोटावर लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या लखन यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, वैद्यकीय प्रमाणपत्र व शवविच्छेदन अहवालात छाती आणि पोटात गंभीर अंतर्गत दुखापत झाल्यानेच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मृताची पत्नी पिंकी लखन जगताप (वय ३०) यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिसांनी पिता-पुत्राविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.