कुपवाडमध्ये भाच्याचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. 
सांगली

सांगली : कुपवाडमध्ये भाच्याचा डोक्यात दगड घालून खून; मामासह मुलाला अटक

Kupwad Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या कारणातून घटना

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून राहूल आप्पासाहेब सुर्यवंशी (वय ३८, मूळ गाव येडूर मांजरी, कर्नाटक. सध्या रा.प्रकाशनगर गल्ली नं ३, कुपवाड) या तरुणाचा मामा व त्याच्या मुलाने डोक्यात दगड घालून निर्घून खून केला. ही घटना मंगळवारी (दि.४) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संदीप रावसाहेब सावंत (वय ५२), सौरभ संदीप सावंत (२२, दोघेही रा.प्रकाशनगर गल्ली नं.३,कुपवाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राहूल सुर्यवंशी हा मूळचा कर्नाटक राज्यातील येडूर मांजरीचा आहे. त्याची आई व भाऊ हे दोघे गावी राहतात. गेल्या काही महिन्यापूर्वी राहूल सुर्यवंशी हा कामानिमीत्त कुपवाड येथे आला होता. तो कुपवाड औद्योगिक वसाहत मधील एका कंपनीत काम करीत होता.आज (मंगळवारी) सुट्टी असल्याने तो घरी एकटाच होता. राहूल सुर्यवंशी हा गेल्या आठ ते दहा दिवसापासून नात्यातील एका अल्पवयीन मुलीची छेड काढीत होता. पिडित मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी राहूल याला वेळोवेळी समज दिली होती. तरीही तो ऐकत नव्हता.

मंगळवारी दुपारी राहूल सुर्यवंशी याने पिडित मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार नातेवाईक असलेला त्याचा मामा संदीप सावंत व मुलगा सौरभ सावंत याच्या निदर्शनास आला. संशयित सौरभ सावंत याचा राग अनावर झाला. सौरभ याने रागाच्या भरात सुर्यवंशी याला पकडून मारहाण केली. तर संशयित संदीप सावंत याने लोखंडी रॉडने हल्ला केला. संशयित सौरभ याने शेजारी पडलेला दगड हातात घेऊन त्याच्या डोक्यात घातला. डोक्यात वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. राहूल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच संशयित फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राहूलला त्यांनी आयुष हेल्पलाइन टीमच्या मदतीने सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर संशयित आरोपी सौरभ सावंत व संदीप सावंत यांना तातडीने ताब्यात घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर, गृह विभागाच्या उप अधीक्षक एम. विमला यांनी घटनास्थळी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT