गांजा Pudhari file photo
सांगली

Sangli Crime : कुपवाडमध्ये गांजा विक्री; एकास अटक

13 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : कुपवाड शहरातील उल्हासनगर परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला कुपवाड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 523 ग्रॅम वजनाचा आणि सुमारे 13 हजार 85 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. नरसगोंडा ऊर्फ बंडू आदगोंडा चिंचवाडे (वय 40, रा. कुबेर किराणा दुकानाच्या मागे, उल्हासनगर, कुपवाड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नशामुक्त भारत अभियानांतर्गत अवैध अमली पदार्थ विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी या कारवाईसाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती केली होती. बुधवारी, दि. 13 मेरोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास हे पथक गस्त घालत असताना, हवालदार वैभव पाटील यांना उल्हासनगरमधील एका चिंचोळ्या बोळात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक घाडगे यांनी पथकासह तातडीने संबंधित ठिकाणी सापळा लावला. गांजा विक्री करत असतानाच संशयित नरसगोंडा चिंचवाडे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे 523 ग्रॅम गांजा मिळून आला.

या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अमोल थोरात, बळीराम पवार, भोसले, हवालदार वैभव पाटील, नीलेश कोळेकर, राजेश कांबळे, संदीप घस्ते, प्रकाश सांगोलकर आणि चंद्रकांत खोबरखेडे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास उपनिरीक्षक अमोल थोरात करीत आहेत. कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणीही अवैध अमली पदार्थांची विक्री करत असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT