भिलवडी : येथे सोमवारी कृष्णा नदीच्या कोरड्या पात्रात बसून आंदोलन करताना आमदार विश्वजित कदम, महेंद्र लाड, प्रतीक पाटील व कार्यकर्ते. 
सांगली

Sangli Protest : कृष्णेत पाणी सोडा; अन्यथा तीव्र आंदोलन

आमदार विश्वजित कदम यांचा कोरड्या नदीपात्रात ठिय्या; ३० तारखेच्या बैठकीत तोडगा काढण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

भिलवडी : कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. याबाबत येत्या ३० तारखेला होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा पलूस-कडेगावचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सोमवारी दिला. साटपेवाडी येथून सोडलेले पाणी बंद केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘मी स्टंटबाजी करणारा आमदार नाही. लोकांचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

भिलवडी (ता. पलूस) येथे कृष्णा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कदम यांनी आंदोलन केले. यावेळी कदम म्हणाले, कृष्णा खोऱ्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर तातडीने तोडगा काढावा. या प्रश्नावर राजकारण न करता जनतेला दिलासा द्यावा. यासंदर्भात पाटबंधारेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून, त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

वीज निर्मितीसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि शेजारील राज्यांकडून वीज खरेदी करण्याची क्षमता राज्याकडे आहे. त्यामुळे वीज निर्मितीसाठी पाणी वापरण्यापेक्षा शेती, पिण्याचे पाणी आणि अन्य गरजांसाठी त्याचा वापर करणे आवश्यक आहे, असे कदम म्हणाले. पाणी सोडून पुन्हा बंद करण्यापेक्षा कमी प्रमाणात सातत्याने पाणी सोडावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

विद्युत वितरण आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साटपेवाडी येथून सोडलेले पाणी औदुंबरपर्यंत पोहोचले होते; मात्र त्यानंतर पाणी सोडणे बंद करण्यात आले. पुढील आदेशानुसार पाणी सोडण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी आंदोलकांना सांगितले. दरम्यान, अंकलखोप, भिलवडी, चोपडेवाडी, सुखवाडी, तुंग, धनगाव आणि खंडोबाचीवाडी येथील सरपंचांनी बोरबनजवळ बंधारा बांधण्याची मागणी करणारे ठराव आमदार कदम यांच्याकडे सादर केले.

आंदोलन सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांचा फोन

आंदोलन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दूरध्वनी आल्याचे कदम यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दुष्काळाची तीव्रता मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. महत्त्वाची बैठक असल्याने पुन्हा बोलतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे कदम यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT