सांगली : जिल्ह्यात रविवारी तुरळक पावसाच्या सरी पडल्या. कोयना धरणातून दोन दिवसांपासून पाणी सोडत असल्यामुळे कृष्णा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. सांगलीत सायंकाळी आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी २९ फूट ३ इंचावर गेली होती. पाणी वाढत असल्यामुळे पाणी पातळी ३० फुटावर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २४ तासात सरासरी १.७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक १०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
मिरज तालुक्यातील समडोळी- कोथळी बंधारा रस्त्यावर चार फूट, तर नांद्रे -ब्रम्हनाळ ग्रामीण मार्ग बंधाऱ्यावर सहा फूट पाणी आले आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये अशी आहे. मिरज ०.७ (२४५.२), जत ०.१ (१६८.६), खानापूर ०.७ (२५७.३), वाळवा २.१ (३५८.५), तासगाव ०.७ (२६१.१), शिराळा १०.२ (७११.७), आटपाडी ०० (१८३.३), कवठेमहांकाळ ०.२ (१५४.२), पलूस ०.९ (२६५.५), कडेगाव १.२ (३०८.६).
रविवारी सायंकाळी ५ वाजता पुलाच्या ठिकाणी पाण्याची पातळी व कंसात इशारा पातळी फुटामध्ये पुढीलप्रमाणे होती. आयर्विन पूल सांगली २९.३ (४०) व अंकली पूल हरिपूर ३२.९ (४५.११). जिल्ह्यातील वारणा धरणात काल सकाळी ८ वाजेपर्यंत २९.७६ टी.एम.सी. पाणीसाठा होता. या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.