सांगली : येथील आयर्विन पुलाच्या समांतर पुलावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत दै. 'पुढारी'ने दि. १ ऑक्टोबर रोजी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यानंतर खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
समांतर पुलावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करत प्रवास करावा लागत होता. काही महिन्यांपूर्वीच रस्त्याचे काम करण्यात आले असतानाही पुन्हा खड्डे पडल्याने वाहनधारकांतून नाराजी व्यक्त होत होती.
अखेर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. नुसते खड्डे बुजवून उपयोग नाही. खड्डे पुन्हा पडणार नाहीत, यासाठी कामाचा दर्जा आणि रस्त्याची गुणवत्ता याकडेही प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. काही महिन्यांतच पुन्हा रस्ता खराब होण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा वाहनधारकांतून व्यक्त होत आहे.