Leopard pudhari
सांगली

Leopard News : कृष्णाकाठी शेतात बिबट्या, जोडीला चोरटे

शेतकऱ्यांचा जीव टांगणीला; चोरीच्या घटना

पुढारी वृत्तसेवा

सुनील माने

ईश्वरपूर : कृष्णाकाठ परिसरात आधीच बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी भयभीत असताना आता शेतातील केबल चोरट्यांनीही अक्षरशः धुमाकूळ माजवला आहे. बहे, हुबालवाडी, तांबवे, खरातवाडी आदी गावांमध्ये शेतातील विद्युत केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी वर्ग संतप्त झाला असून पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बहे व हुबालवाडी परिसरातील नेवरा सावंत, प्रतापराव थोरात, रामचंद्र सूर्यवंशी, बाबुराव हुबाले आणि संपतराव हुबाले यांच्या शेतातील केबल अवघ्या पाच दिवसात तब्बल तीनवेळा चोरीला गेल्या आहेत. शामराव मदने यांच्या शेतातील वायरही चोरट्यांनी लंपास केली आहे. प्रत्येक शेतातून सुमारे 80 ते 130 फुटापर्यंत केबलची चोरी करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे चोरटे केवळ वायर चोरून नेत नाहीत, तर शेतातच दगडाने वायर ठेचून तोडतात. त्यानंतर त्याच ठिकाणी वायर जाळून आतील तांब्याच्या तारा वेगळ्या करून त्या घेऊन पसार होतात. त्यामुळे शेतपरिसरात जळालेल्या वायरचे अवशेष आणि नुकसानग्रस्त विद्युत साहित्य पडून असल्याचे चित्र दिसत आहे.

कृष्णा नदीकाठच्या भागात पूर्वी विद्युत मोटारी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत होते. मात्र शेतकऱ्यांनी मोटारी पाण्यात बसवण्यास सुरुवात केल्यानंतर आता चोरट्यांनी वायर चोरीकडे मोर्चा वळवला आहे. रात्रीच्यावेळी बिबट्याच्या भीतीमुळे शेतात जाण्यास शेतकरी धजावत नसल्याचा फायदा चोरटे घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT