सांगली : ऐन पावसाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी वेगाने खाली गेल्याने जिल्ह्यातील नदीपात्रातून केला जाणारा पाणी उपसा रविवारपासून अचानक पूर्ण बंद करण्यात आला. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. परतीच्या पावसाची आशा असली, तरी ढग येतात आणि जातात. रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो झिरमाट म्हणता येईल, असाही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी आहे. सध्या अनेक तालुक्यांत पिके होरपळली आहेत, तर उर्वरित पिकेही होरपळण्याची शक्यता आहे.
प्रकल्प, नद्या व तलावांमधून शेती तसेच औद्योगिक कारणांसाठी (बिगर सिंचन) खासगीरीत्या पाणी उपसणाऱ्या सर्व योजनांवर उपसाबंदी लागू आहे. हा आदेश पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील, अशी माहिती सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली. केवळ पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांना उपसाबंदीतून सूट आहे.
उपसाबंदीचे क्षेत्र व तलाव
ही उपसाबंदी कृष्णा नदीच्या मौजे अटके (ता. कराड, जि. सातारा) ते डिग्रज (ता. मिरज) बंधारा आणि राजापूर बंधाऱ्यापर्यंत (महाराष्ट्र राज्य हद्दीपर्यंत) लागू आहे. याशिवाय मोरणा नदी व त्यावरील बंधाऱ्यांचे दोन्ही तीर, जत तालुक्यातील सर्व तलाव, तसेच कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा व शिराळा तालुक्यांतील सांगली पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या १७ तलावांचा यामध्ये समावेश आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील बसाप्पावाडी मध्यम प्रकल्पासह बंडगरवाडी, बोरगाव, दुधेभावी, घोरपडी, हरोली, कुची, लांडगेवाडी, लंगरपेठ, नांगोळे व रायवाडी हे १० लघु प्रकल्प; मिरज तालुक्यातील भोसे लघु प्रकल्प; शिराळा तालुक्यातील मोरणा शिराळा मध्यम प्रकल्पासह अंत्री, शिवणी, टाकवे व वाकुर्डे हे चार लघु प्रकल्प; तसेच वाळवा तालुक्यातील रेठरे धरण व कार्वे लघुप्रकल्पाचा यामध्ये समावेश आहे.
जत तालुक्यातील २६ तलाव
जत तालुक्यातील कोसारी, तिप्पेहळ्ळी, वाळेखिंडी, सिद्धनाथ, रेवणाळ, बिरनाळ, शेगाव क्र. १ व क्र. २, जालिहाळ, येळवी, सोरडी, प्रतापूर, सनमडी, भिवर्गी, दरिबडची, पांडोझरी, अंकलगी, मिरवाड, गुगवाड, डफळापूर, बिळूर (केसराळ), उमराणी, खोजनवाडी, बेळुंखी आणि दोड्डानाला या २६ तलावांवर उपसाबंदी लागू राहील.
नियम मोडल्यास वीज जोडणी खंडित होणार
उपसाबंदीच्या काळात पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील नदी, मध्यम व लघुप्रकल्पांतून अनधिकृत पाणी उपसा केल्यास पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षासाठी रद्द केला जाईल. तसेच उपसा संचसामग्री जप्त करून पोलिसांत तक्रार दाखल केली जाईल.