Krishna River 
सांगली

Krishna River Pollution : कृष्णेत मिसळते दररोज ६.८० कोटी लिटर दूषित पाणी

मंगेश चव्हाण : सत्ताधाऱ्यांना दिवाळीत शेरीनाल्याच्या पाण्याने अभ्यंगस्नान घालण्याचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे ६८ 'एमएलडी' (दररोज ६ कोटी ८० लाख लिटर) दूषित व सांडपाणी थेट कृष्णा नदीत मिसळत आहे. त्यामुळे नदी गंभीररीत्या प्रदूषित होत आहे. मात्र, सत्ताधारी आमदार तसेच महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना याचे कोणतेही गांभीर्य राहिलेले नाही.

नदीचे प्रदूषण कायमस्वरूपी रोखण्यासाठी नव्या शेरीनाला योजनेला मंजुरी मिळावी म्हणून त्यांनी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. उलट केवळ रस्त्यांचे पॅचवर्क आणि पूर नियंत्रणाच्या कामांतच सत्ताधाऱ्यांना विशेष रस आहे. सत्ताधार्‍यांनी येत्या एक महिन्यात नवीन शेरीनाला योजना मंजूर करून नदी प्रदूषणाचा प्रश्न मार्गी न काढल्यास दिवाळीत सत्ताधाऱ्यांना शेरीनाल्याच्या पाण्याने अभ्यंगस्नान घालू आणि शेरीनाल्यावरच तीव्र उपोषण सुरू करू, असा इशारा महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कृष्णा नदीच्या पात्रात शेरीनाल्यासह इतर उपनाल्यांचे दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळत असल्याने नदी भयानक प्रदूषित झाली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे सांगत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, नगरसेवक राजेश नाईक, फिरोज पठाण, मयूर पाटील, नगरसेविका बिलकीस बुजरूक, अश्विनी कदम यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांनी कृष्णा नदी पात्राची बोटीतून प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याचे दिसून आले. यानंतर लोकप्रतिनिधींनी पत्रकारांशी संवाद साधला.

मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की, कृष्णा नदी पात्रात एमआयडीसीमधील कारखाने, छोटे-मोठे उद्योग, शेरीनाला यासह आसपासच्या गावांमधील दररोज ६८ एमएलडी सांडपाणी थेट मिसळत आहे. यामुळे नदीचे पाणी पूर्णपणे हिरवे पडले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीत धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याची मागणी उत्सवापूर्वीच करणे आवश्यक होते. मात्र, तशी कोणतीही मागणी सत्ताधार्‍यांनी वेळेवर केली नाही. यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT