सांगली

Sangli Rain: कोयना-चांदोली धरणे वेगाने भरू लागली

बहे, सावर्डेसह जिल्ह्यातील चार बंधारे पाण्याखाली

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना आणि चांदोली (वारणा) धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. दोन्ही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. वारणा धरणातील पाणीसाठा आता १४.५९ टीएमसीवर पोहोचला आहे.

शिराळा तालुक्यातील कोकरूड, चरण, चांदोली आणि पाथरपूंज परिसरात अतिवृष्टीमुळे वारणा व मोरणा नदीच्या पाण्याने पोटमळ्यात प्रवेश केला आहे. बहे आणि मांगले-सावर्डे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चरण येथील स्मशानभूमीत पाणी शिरले आहे. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती दलाची पथके जिल्ह्यात दाखल झाली आहेत. शिराळा वगळता जिल्ह्यातील इतर भागांत मात्र दिवसभर तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता.

सतत सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, कृष्णा नदीवरील चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामध्ये वाळवा तालुक्यातील बहे, मिरज तालुक्यातील सांगली व म्हैसाळ आणि शिरोळ तालुक्यातील राजापूर या बंधार्‍यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत सांगली येथील आयर्विन पुलापाशी पाण्याची पातळी १२.६ फूट (इशारा पातळी ४० फूट) तर हरिपूर येथील अंकली पुलापाशी १५.९ फूट (इशारा पातळी ४५.११ फूट) इतकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT