सांगली ः सांगली - कोल्हापूर रस्त्याचे अंकली फाट्यापर्यंत चौपदरीकरण करताना गटार करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांची आहे. गटार झाल्याशिवाय रस्ता करू नका, असे म्हणत या परिसरातील नागरिक, शेतकरी आणि व्यापार्यांनी काम बंद पाडले होते. त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. त्याचवेळी आता रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्यासाठी 25 कोटी रुपये मंजूर असून, सहा महिन्यात हा रस्ता पूर्ण होणार आहे.
सांगली-कोल्हापूर रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. रत्नागिरी-नागपूर या महामार्गाचे काम अंकलीपर्यंत झाले आहे. त्याचवेळी कोल्हापूर रस्त्यावर वाहनांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली बस स्थानक ते अंकली फाटा रस्ता रुंदीकरणासाठी पाठपुरावा करून 25 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. ऑक्टोबरमध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवातही झाली होती. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारीची मागणी कोल्हापूर रस्ता परिसरात राहणार्या नागरिकांनी केली होती. या मागणीसाठी स्थानिक रहिवासी, शेतकरी, व्यापारी आक्रमक झाले होते. त्यांनी चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटार मंजूर आहे, असे आदेश पाहिल्यानंतरच काम सुरू करता येईल, असे कंत्राटदारास सांगितले होते. जोपर्यंत गटार होत नाही, तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम बंद राहील, असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे हा विषय प्रलंबित राहिला होता. आता निवडणूक झाल्यानंतर बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात रस्ता रुंदीकरण करण्यात येईल, त्यानंतर पुढील टप्प्यात गटारीचे काम करण्यात येणार आहे.