सांगली : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचा प्रश्न अखेर आता मार्गी लागणार आहे. अंकली (सांगली) ते शिरोली (कोल्हापूर) महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची निविदा जाहीर झाली असून, ‘हायब्रीड अॅन्युईटी मॉडेल’च्या धर्तीवर हा रस्ता करण्यात येणार आहे.
हैदराबाद येथील अवंतिका कन्स्ट्रक्शन (आय) लिमिटेड कंपनीची 8.14 टक्के कमी दराची निविदा भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने मंजूर केली आहे. त्यामुळे निविदेची उर्वरित प्रक्रिया पूर्ण होऊन 15 दिवसांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 758 कोटी 75 लाख अशी प्रकल्प किंमत निश्चित केली होती. श्री अवंतिका कंपनीने 8.14 टक्के कमी दराने म्हणजेच 696 कोटी 96 लाख रुपयांची निविदा दाखल केली होती. त्यामुळे त्यांना काम मिळाले.
चोकाकपासून निमशिरगाव, जैनापूर, अंकली असा चौपदरीकरणाचा मार्ग आहे. याला दोन वर्षांची मुदत देण्यात आली असून, एकूण 33.60 किलोमीटर अंतराचे हे काम आहे.