दिलीप भिसे
सांगली/कोल्हापूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर-सांगली मार्ग अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह स्थानिक यंत्रणांची उदासीनता, बेफिकिरीमुळे महामार्गावर सांगली फाट्यापासून अंकली फाट्यापर्यंत ४० किलोमीटरवर अपघाताचे ४२ ब्लॅक स्पॉट जीवघेणे आहेत. दीड वर्षात शंभरावर अपघातांमध्ये ४८ निष्पापांना जिवाला मुकावे लागले आहे. अपघाती घटनांमुळे वाहनधारक, मार्गालगत राहणाऱ्या व्यावसायिकांसह ग्रामस्थांमध्ये चिंतेचे सावट आहे.
दळणवळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या सांगली-कोल्हापूर मार्गाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव २०१२ पासून प्रलंबित आहे. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचा सर्व्हेही केला. दीडशे कोटींहून अधिक निधीची घोषणाही झाली. प्रत्यक्षात अजूनही ताळमेळ नाही. परिणामी, अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे वाहनधारक, नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रोज हजारो लोकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
चौकातील पुलाचा धोकादायक सांगाडा हटवा
महामार्गावर हालोंडीसह वडगाव फाटा, हेर्ले माळभाग, माले, अतिग्रे, इचलकरंजी फाट्यावर वाहनांची वर्दळ लक्षात घेता, स्वयंचलित सिग्नल व्यवस्था, गतिरोधक, रस्त्यावर पांढर्या पट्ट्यांची आवश्यकता आहे. हातकणंगले बसथांब्यासमोरील चौकात उड्डाण पुलासाठी उभारलेला सिमेंट पुलाचा सांगाडा वाहनधारकांसह नागरिकांनाही डोकेदुखीचा ठरला आहे. अपघाताला निमंत्रण देणारा हा सांगाडा तत्काळ हलवावा, अशी मागणी होत आहे. त्याकडे कोणीही गांभार्याने पाहत नाहीत.