कोकरूड/ शिराळा शहर : तो खोलीत येऊन कॉटखाली बसलेला... कधी तरी रात्रीच येऊन बसलेला असावा... ती सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे या खोलीत जात होती, वाळलेले कपडे आणण्यासाठी... दैनंदिन काम... तिला दिसले, कॉटखाली कोणी तरी येऊन बसले आहे... तिला प्रारंभी वाटले कुत्रे असावे... तिने त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला... आणि तो गुरगुरू लागला... ती सावध, सतर्क झाली. पाहिले तर, तो होता मादी बिबट्या... उमदे, देखणे जनावर... वय वर्ष दीड ते दोन... अर्थातच ती प्रचंड घाबरलेली... तशा स्थितीतही तिने क्षणार्धात खोलीच्या दाराला बाहेरून कडी लावली आणि एक संभाव्य मोठा अनर्थ टळला.
कोकरूडपैकी माळेवाडी (ता. शिराळा) येथील ही घटना. कोकरूडपासून माळेवाडी पूर्वेला दोन किलोमीटरवर. बिबट्याला पकडून देण्याचे लाखमोलाचे काम फत्ते केलेल्या या महिलेचे नाव अश्विनी गोसावी. तिने घरच्या लोकांना सावध केले. माळेवाडीत बाळू आनंदा गोसावी यांचे दुमजली घर. कुटुंबासोबत ते खालच्या मजल्यावर राहतात, तर वरच्या मजल्यावर आहे अडगळीची खोली. ती वापरतात कपडे सुकविण्यासाठी. त्यामुळे खोलीचा दरवाजा रात्रभर उघडा असतो. खोलीच्या शेजारी असलेल्या शौचालयावरून रात्रीच्या वेळी बिबट्या खोलीत आला आणि कॉटखाली बसला असावा. ग्रामस्थांच्या मदतीने कोकरूड पोलिसांना तत्काळ माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक जयवंत जाधव फौजफाट्यासह दाखल झाले. वन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. वनपाल अनिल वाजे यांनी बिबट्याला जेरबंद केले.
वन खात्याने दरवाजाजवळ पिंजरा लावला. पिंजर्याभोवती अंधार पडावा यासाठी गवत, कापड आदी लावले. त्यानंतर खोलीच्या खिडकीतून बिबट्याला पिंजर्याकडे जाण्यासाठी हुसकावले. पिंजरा लावल्यावर अवघ्या पाचच मिनिटात बिबट्या पिंजर्यात कैद झाला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बिबट्याला रेस्क्यू वाहनामधून शिराळा येथील वन विभागाच्या कार्यालयात आणले. त्याठिकाणी त्याची पशुवैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी केली. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. बिबट्या कैद झाल्याचे समजल्यावर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. एक युवक या खिडकीवर चढून बिबट्याला पाहत होता. बिबट्याच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्याला खोलीबाहेर काढताना वन विभागाला खूपच त्रास झाला. यावेळी उपवनसंरक्षक सागर गवते, सहायक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, शिराळा वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, सुनील कुरी, स्वाती कोकरे, रेस्क्यू टीमचे सदस्य सुशीलकुमार गायकवाड, युनूस मणेर, संतोष कदम, गौरव गायकवाड, विशाल चौगुले, संजय पाटील, सचिन पाटील, राहुल गायकवाड यांनी बिबट्यास जेरबंद केले.
स्थानिक युवकांनी बिबट्याचे व्हिडीओ करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बिबट्याची चिडचीड वाढली, असे वन खात्याच्या सूत्रांनी सांगितले. बघ्यांनी अत्यंत बेजबाबदार वर्तन केल्याचे, व्हिडीओ पाहिले की लक्षात येते. त्यांच्यावर काय कारवाई आणि कधी होणार, हा प्रश्न आहे. कोकरूड पोलिस आल्यावर गर्दी नियंत्रणात आली.
हा बिबट्या मादी आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने मोठ्या धाडसाने काम केले. बिबट्या पूर्ण तंदुरुस्त आहे.नवनाथ कांबळे, सहायक वनसंरक्षक, वन विभाग
मी खोलीत नेहमीप्रमाणे गेले होते. तेथे गुरगुरण्याचा आवाज आला. पहिल्यांदा कुत्रे असावे असे वाटले, पण बिबट्या दिसला. त्यानंतर पळत जाऊन खोलीला पहिल्यांदा कडी लावली. दैव बलवत्तर म्हणून माझे प्राण वाचले.- अश्विनी गोसावी, माळेवाडी, कोकरूड