सांगली : तब्बल पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली आहे. मात्र अद्याप जवळपास पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रातील खरिपाचा पेरा रखडला आहे. आतापर्यंत 79 टक्केक्षेत्रावर पेरणी झाली आहे. मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून पाच जूनपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे सारे वेळापत्रकच बिघडवून टाकले आहे. या आठवड्यात पाऊस झाला तर ठीक, अन्यथा यावेळचा खरीप हंगाम कोमेजण्याचेच संकट ठाकले आहे.
आता जुलैचा दुसरा आठवडा संपतो आहे. मात्र पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. जिल्ह्यात खरिपासाठी 2 लाख 46 हजार 115 हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. आजअखेर यापैकी 1 लाख 94 हजार 708 हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या 79.11 टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे. आणखीन दहा-बारा दिवस पाऊस झाला नाहीतर यावेळीदेखील खरीप वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. यावेळी मे महिन्यापासूनच पावसाने टिप्पिरा देण्यास सुरुवात केली. मेचा दुसरा पंधरवडा आणि जूनचा पहिला पंधरवडा या महिन्यात पावसाने जिल्ह्यात तुफानी बॅटिंंग केली. मात्र आता पंधरा दिवस झाले पावसाने चांगलीच दडही मारली आहे. मात्र या दरम्यान, राहिलेल्या क्षेत्रात खरीप पेरणीसाठी तयारीत असलेला शेतकरी चिंतातूर झाला आहे. अजूनदेखील जिल्ह्यात जवळपास 51 हजार 526 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत राहिले आहे. आणखीन आठवडाभर पावसाने दडी मारली तर शिवारावर दुबार पेरणीचे संकट ठाकणार आहे.
यावेळी जूनमध्ये झालेल्या पावसाच्या भरोशावर शेतकर्यांनी पेरणी केली. जूनअखेर आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 94 हजार 708 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. मात्र आता आभाळात केवळ ढगच येतात, पाऊस होत नसल्याने अवघ्या शिवारावर मात्र चिंतेचे ‘ढग’ दाटले आहेत. यावेळी जिल्ह्यात खरिपाचे साधारणत: 2 लाख 46 हजार 118 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे. गेल्या खरिपात आजच्या दिवसापर्यर्ंत 13 हजार 458 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. खरे तर जानेवारी, फेबु्रवारीमध्ये पावसाने तयार पिकांचे नुकसान झाले होते. तर द्राक्षबागांना फटका बसला होता. मात्र आता ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात किरकोळ सोडला तर दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी आगाप पेरणी केलेली पिके आता होरपळू लागली आहेत.
गत हंगामात 5 जुलै 2024 अखेर खरीप हंगामात जिल्ह्यात सोयाबीनची 49 हजार 89 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. यावेळी 26 हजार 596 हेक्टमध्ये पेरणी झालेली आहे. आगाप सोयाबीन फारसे दिसत नाही. मात्र आतादेखील पावसाने उघडीप दिली तर या पिकाला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. भात पिकाचे शिराळा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. यावेळी उन्हाळ्यातच पाऊस झाला. यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे होऊ शकली नव्हती. तर पाणी असूनदेखील विजेच्या लपंडावामुळे पाणी देता न आल्याने बागायती शेतकर्यांचेदेखील मोठे नुकसान झाले. भाताची यावेळी आजअखेर 13 हजार 441 हेक्टर क्षेत्रापैकी जेमतेम 4 हजार 393 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. अजून जवळपास 70 टक्के क्षेत्रात भाताची लागवड बाकी राहिलेली आहे. जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी सर्वाधिक क्षेत्र हे सोयाबीन (41 हजार 935 हेक्टर) आणि त्याखाली ज्वारीचे (25 हजार 968 हेक्टर) आहे. वाळवा, पलूस, मिरज पश्चिमभागासह शिराळा तालुक्याच्या नदीकाठच्या भागात सोयाबीनचे मोठे क्षेत्र राहते. मात्र यावेळी आगाप पावसाने या सार्या चित्रात बदल झाला आहे.
आता जुलैचा दुसरा आठवडा संपत आला. पंधरवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या पावसाळ्यात पावसाचे विलंबाने आगमन झाले होते. मात्र पुढे हंगामात समाधानकारक पाऊस झाला. नंतर तर पुराचे संकट ठाकले. तसेच दुष्काळी टापूत, खानापूर घाटमाथा, कडेगाव परिसर या सार्या भागात तुफानी अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे भूजल पातळी चांगलीच वाढली होती. मात्र यावेळी मे मध्येच पावसाळा सुरु झाला.जूनमध्ये सरासरीच्या उंबरठ्यावर पाऊस पोहोचला. मात्र आता उघडीपीने खरीप हंगाम आणि कोवळी खरीप पिके धोक्यात आली आहेत.