Blood Cancer Researcher Dr Ashokrao Patil Death
विटा : सांगली जिल्ह्यातील सुलतानगादे (ता. खानापूर) गावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ संशोधक डॉ. अशोकराव धर्माजी पाटील (वय ७४) यांचे पुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
ब्लड कॅन्सर अर्थात रक्ताच्या कर्करोगावर त्यांनी निर्माण केलेल्या औषधास अमेरिकन सरकारने मान्यता दिली होती. इतकेच नव्हे तर तेथील सरकारने त्यांचा पारितोषक देऊन विशेष सन्मानही केला होता.
सुलतानगादे येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अशोकराव पाटील यांना विज्ञान अभ्यासात रुची होती. त्यांनी पुणे विद्यापीठात पीएचडी पदवी संपादन केली होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण खानापूर तालुक्यातील सुलतानगादे आणि खानापूर माध्यमिक विद्यालय येथे झाले.
अमेरिकेत वास्तव्यास होते, तरी सुलतानगादे गावाबद्दल त्यांना फार जिव्हाळा होता. ते गावी यायचे. त्यांच्या जाण्याने खानापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.