Firing Pudhari
सांगली

Lengare Firing Case : लेंगरे गोळीबारप्रकरणी सूत्रधारास अटक

गावठी पिस्तूल जप्त; विटा पोलिसांची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

विटा : लेंगरे (ता. खानापूर) येथे मोटारीवर गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील मुख्य संशयितास अटक करण्यात विटा पोलिसांना यश आले. प्रथमेश ऊर्फ सुंदऱ्या दगडू खिलारे (वय 20, रा. लेंगरे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 70 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. याबाबत बाळासाहेब आकाराम गुजले यांनी फिर्याद दिली होती. ही घटना 15 मे रोजी रात्री घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लेंगरे येथे बाळासाहेब गुजले यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. 15 मे रोजी रात्री या परिसरात उभ्या असलेल्या त्यांच्या मोटारीवर (क्र. एमएच 01 डीई 1884) काहींनी गोळीबार केला होता. याप्रकरणी विटा पोलिस ठाण्यात आर्म ॲक्ट आणि भारतीय न्यायसंहितेच्या कलम 324 (4) अन्वये गुन्हा दाखल होता.

पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय अधिकारी विपुल पाटील यांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत होते. यावेळी पोलिस अंमलदार उत्तम माळी, महेश देशमुख, अक्षय जगदाळे यांना संशयित प्रथमेश ऊर्फ सुंदऱ्या खिलारे हा वाळूज रोड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. तेथे पोलिसांनी तातडीने सापळा रचून सुंदऱ्या खिलारे याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल त्याचा साथीदार प्रथमेश ऊर्फ पिन्या मुकुंद शिंदे याने आपल्या घरासमोरील मोकळ्या प्लॉट्समधील एका खड्ड्यात लपवून ठेवल्याची कबुली त्याने दिली.

पोलिसांनी पंचासमक्ष 70 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त केले. अटकेतील संशयित वगळता प्रथमेश ऊर्फ पिन्या मुकुंद शिंदे आणि आणखी एक फरार आहे. कारवाईत विटा पोलिस ठाण्याचे अमोल पाटील, उत्तम माळी, महेश देशमुख, किरण खाडे, अक्षय जगदाळे, महेश संकपाळ, विलास मोहिते, वैभव कोळी, तसेच सायबर विभागाचे विजय पाटणकर, करण परदेशी आणि इम्रान महालकरी यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT