Khanapur Drought Administrative Meeting
विटा : ‘सर्वांनी एकत्रितपणे दुष्काळाच्या संकटाचा सामना करायचा आहे. त्यामुळे मला उगाच कागदी घोडे नाचवून दाखवू नका. शेतकऱ्यांना मदत करताना प्रशासनाने हात आखडता घेऊ नये,’ अशा शब्दांत आमदार सुहास बाबर यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
खानापूर तालुक्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार सुहास बाबर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली. यावेळी प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोम्पे, सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास शिंदे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. शितल बाबर, ॲड. सई शिंदे, मनिषा बागल, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत पिण्याचे पाणी, चारा टंचाई, वीज समस्या आणि जलसंधारणाच्या कामांवर सविस्तर चर्चा झाली. तालुका कृषी अधिकारी धनराज राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील १९ हजार ८७१ शेतकरी बाधित झाले असून सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका बसला आहे. यामध्ये १२ हजार ६६९ हेक्टर जिरायती आणि सुमारे सहा हजार हेक्टर बागायती क्षेत्राचा समावेश आहे. मात्र, आले आणि ऊस पिकांचे पंचनामे झाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. तसेच २०२६-२७ ची पीकपाणी नोंद अद्याप उपलब्ध नसल्याची बाबही समोर आली. यावर सर्व पिकांचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश आमदार बाबर यांनी दिले.
पाणीटंचाईचा आढावा घेताना चिंचणी, मंगरूळ आणि कार्वे येथे वीजजोडणीअभावी पाणीपुरवठ्याच्या विहिरींचा वापर होत नसल्याचे स्पष्ट झाले. जखिनवाडी येथे २९ सप्टेंबरला मागणी करूनही पाणीपुरवठ्यासाठी विहीर अधिग्रहणाला मंजुरी मिळाली नसल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे मागणी प्राप्त झाल्याच्याच दिवशी अधिग्रहणाचे मंजुरीपत्र देण्याची सूचना त्यांनी केली. वाझर येथेही वीजजोडणीअभावी पाणीपुरवठा बंद असून, हिवरे येथे चार दिवसांतून एकदा पाणी मिळत असल्याचे सांगण्यात आले.
जानेवारीपर्यंत २३ गावांत, तर एप्रिल ते जूनदरम्यान १७ गावांत तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर टंचाईग्रस्त गावांचे अधिग्रहण प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे आदेश बाबर यांनी दिले. घोटी बुद्रुक येथे तलावापासून जुन्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइनचा प्रस्ताव तयार करण्यासही सांगितले.
आगामी १५ नोव्हेंबरपासून टेंभू योजनेचे आवर्तन सुरू होणार आहे. आवर्तनादरम्यान शेवटच्या टोकावरील गावांना पाण्यासाठी प्राधान्य द्यावे, तसेच येरळा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये फळ्या वाढवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. पशुसंवर्धन विभागाने पुढील १५ दिवसांत जनावरांचे टॅगिंग पूर्ण करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.