Crime Pudhari
सांगली

Sangli Crime : बांबवडे ग्रामसभेच्या वादाला हिंसक वळण

सरपंच व शेतकऱ्याकडून परस्परांविरोधी फिर्यादी दाखल

पुढारी वृत्तसेवा

पलूस ः बांबवडे (ता. पलूस) येथील ग्रामसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नोत्तरांच्या वादाला अखेर हिंसक वळण लागले असून, सरपंच अरविंद हणमंत मदने आणि शेतकरी दीपक जगन्नाथ कदम यांनी परस्परांविरोधात पलूस पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही बाजूंनी मारहाण, शिविगाळ, धमकी आणि दगडफेकीचे आरोप करण्यात आल्याने गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

दीपक जगन्नाथ कदम (वय 36, रा. बांबवडे) यांच्या फिर्यादीनुसार, 15 मे रोजी रात्री 8 वाजता ते कुटुंबासह घरात असताना सरपंच अरविंद मदने व ग्रामपंचायत सदस्य विजय संपत पवार अचानक त्यांच्या घरात घुसले. डिसेंबर 2025 मधील ग्रामसभेतील प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात मागून प्रशासनाला उत्तर देण्यास भाग पाडल्याचा राग मनात धरून सरपंचांनी शिविगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी दीपक यांच्या मुलाला भिंतीवर ढकलले तसेच आई-वडिलांनाही धक्काबुक्की केली. या गोंधळात दीपक यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन गहाळ झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूने, सरपंच अरविंद हणमंत मदने (वय 39, रा. बांबवडे) यांनीही दीपक कदम यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, ग्रामसभेतील प्रश्नांची उत्तरे तोंडी देण्यात आली असतानाही दीपक कदम गावात गैरसमज पसरवत होते. यावर चर्चा करण्यासाठी सरपंच अरविंद मदने आणि विजय पवार हे दीपक यांच्या घरी गेले होते. तिथे चर्चा सुरू असताना शाब्दिक बाचाबाची झाली आणि दीपक कदम यांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच सरपंच तिथून आपल्या दुचाकीवरून निघून जात असताना पाठीमागून दगड फेकून मारल्याने त्यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली, असे तक्रारीत नमूद आहे. दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांची नोंद शनिवार, दि. 16 मे रोजी पहाटे करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT