कवठेमहांकाळ : महाराष्ट्र-कर्नाटकात दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केले. फिरोज नबीलाल मुल्ला (रा. जुळेवाडी, ता. तासगाव) असे संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या ३१ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या या वाहनांची एकूण किंमत १२ लाख ४० हजार रुपये आहे.
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दाखल एका दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना, गुन्हे प्रकटीकरण पथकाला या प्रकरणातील संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. याआधारे पोलिस पथकाने कवठेमहांकाळ ते थबडेवाडी रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ सापळा रचला. यावेळी एक संशयित दुचाकीवरून (क्र. एमएच ५० एक्स ३२२०) येताना दिसला. मात्र, समोर पोलिसांना पाहताच त्याने दुचाकी सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून त्याला जागीच पकडले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने आपल्याजवळील दुचाकी जाखापूर येथून चोरल्याची कबुली दिली. या गुन्ह्याप्रकरणी त्याला तातडीने अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या पुढील तपासात या चोरट्याने कवठेमहांकाळ, सांगोला, कराड, सातारा, इचलकरंजी, कुरुंदवाड, कुर्डुवाडी, तसेच कर्नाटकातील निपाणी, रायबाग आणि अथणी या भागातून अनेक दुचाकी चोरल्याचे कबूल केले.